रस्त्यावर वेगाने गाडी चालवत असताना गतिरोधके येतात तेव्हा आपण गाडीचा वेग कमी करतो. आपण कधीही गतिरोधकावरून वेगाने गाडी चालवून ते ओलांडत नाही. कारण अपघात होण्याची जास्त शक्यता असते. असेच काहीसे अपयशाबाबत असते. तेसुद्धा आपल्या जीवनात एका गतिरोधकाचेच काम करत असते. ते आपल्याला सावधान करते की नेहमी एकसारखा वेग ठेवणे योग्य नाही. असे गतिरोधक आल्यानंतर आपल्याला थांबावे लागते. मात्र खाचखळगे किंवा गतिरोधके आल्यावर वेग कमी करणे आवश्यक असते. असे केल्यास आपल्या आयुष्यात होणारे अपघात आपण टाळू शकतो. अशा प्रकारे तुम्ही आपला प्रवास चालू ठेवून पूर्ण करू शकता.
काही अडथळा न येता तुम्ही आपल्या ध्येयापर्र्यंंत पोहोचू शकता. हे शक्यही आहे. मात्र तेथे पोहोचल्यानंतर आपण जीवनाचा एक चांगला चालक आहोत असे समजणे योग्य ठरणारे नाही. शिवाय अपयश आल्यास ढासळून जाऊ नये. कारण अपयश तुम्हाला परत एकदा तुमची शक्ती एकवटण्यास सांगते. त्यातूनच आपल्याला आपल्या शक्तीचा किंवा कार्यक्षमतेचा अंदाज येत असतो. मात्र त्यानंतर येणाºया संकटांना आपण केव्हाही तयार असतो. त्यामुळे अपयश पचवूनच पुढे जायचे असते.
किंबहुना या अपयशालाच आपली शक्ती समजायचे असते. त्यातूनच प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार होणे म्हणजेच खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करणे होय. वास्तविक पाहता अयशस्वी होण्याअगोदरच आपल्या मनात त्याविषयी भीती निर्माण होते. अशी स्थिती निर्माण होताच आपल्या शरीरात अॅण्ड्रेनेलिन हार्मोनचा स्राव सुरू होतो. हा स्राव आपल्याला येणारे अपयश स्वीकारण्यास प्रेरित करतो. एकदा आपल्या डोक्यातून अपयशाचे भूत पळाले की परत आपण पूर्वस्थितीमध्ये येतो. या भीतीवर जय मिळवणे हेच आपले पहिले लक्ष्य असायला हवे.
यावर एका छान गोष्टीचा दृष्टांत देता येईल. एका जंगलात वाघांची संख्या जवळजवळ शंभर होती. पण मेंढ्यांची संख्या हजारोंमध्ये होती. त्यामुळे वाघाच्या पिलांना त्या मेंढ्या खूप त्रास देत असत. मग वाघ वैतागून बदला घेण्याचे ठरवतात. माकडाला ते पंच बनवतात. वाघ व मेंढ्यांमध्ये युद्ध जाहीर केले जाते. यात माकड वाघांना एक कल्पना सुचविते. ते म्हणते, मेंढ्यांच्या सैन्याचा सेनापती एका वाघाला बनवा व वाघाच्या सैन्याचा सेनापती एका मेंढ्याला बनवा. यावर वाघ विचार करतात व त्याला संमती देतात.
युद्धाच्या मैदानात दोन्ही सैन्ये समोरासमोर येतात. त्यात वाघांचा सेनापती एक मेंढा असतो, तर मेंढ्यांचा सेनापती एक वाघ. माकड युद्ध सुरू होण्याचे बिगुल वाजवते. युद्ध सुरू होते. सुरुवातीलाच मेंढ्यांचा सेनापती असलेला वाघ जोराची डरकाळी फोडतो. ते पाहून वाघांचा सेनापती गारदच होतो व तेथून पळ काढतो. त्यामुळे त्या सेनापती मेंढ्याच्या मागे असलेल्या वाघांना वाटते, आपले सेनापती हरण्याच्या व मरण्याच्या भीतीने पळत सुटले आहेत. त्याप्रमाणे आपणही आता पळायला हवे असे समजून तेही तेथून पळ काढतात. झाले काय, वाघांचीच हार झाली ना? त्यांच्यात एवढी शक्ती असूनही हरण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे त्या शक्तीचा त्यांना साक्षात्कारच झाला नाही. अशा प्रकारे ते या युद्धात हरले. आपलेही अगदी तसेच असते. आपल्याला कुणी हरवूच शकत नाही हा आत्मविश्वास आपल्यामध्ये जागृत होत
होत नाही तोपर्यंत यशाचे शिखर दूरच आहे, असेच म्हणावे लागेल.
No comments:
Post a Comment