Saturday, August 6, 2011

बापानं खस्ता खाल्ल्या म्हणून सारं घर दोन वेळेस पोटभर जेवलं.
त्यानं दिवस-रात्रं एक केले म्हणून, घर सारं सुखानं निजलं.
नोकरी करुनही रात्री त्यानं रीक्षा चालवली.
त्यानं मीटर डाऊन करुन दिवसेंदिवस वाढणारी आमची प्रत्येक गरज भागवली.
तापानं फणफणलो कधी तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.
पण वरवर कठोर दिसणाऱ्या बापाला मात्रं दोन घास जेवण करणही मग जड जायचं.
ऎन उमेदिचा काळ त्यानं हौसमौज न करता आमच्या संगोपनात घालवला.
खिशाला शिमगा असला कधी तरी आम्हाला मात्र नेहमीच त्यानं दिवाळसण दाखवला.
स्वतःच्या बापासमोर तोंडही न उघडणारा आमचा बाप, माझ्याशी मात्र कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारतो.
त्याची आवड कधीही आमच्यावर न लादता, आमच्याच आवडीनं जगण्याचा आग्रह तो आमच्याकडे धरतो.
लहाणपणी राग अनावर झालाच जर कधी तर गालावर पाच बोटं तो उमटवायचा.
पण त्याच रात्री घरी येताना मला आवडतं म्हणून खायला बटरस्कॉच आईस्क्रिम आणायचा.
पोराला ईंजिनियर बनवायचं स्वप्नं बघताना, प्रसंगी स्वतः दुकानात काम करतानाही लाज नाही वाटली त्याला.
पण पंनास हजार फी भरुनही, नापास झाल्यावर, पहिलीच चूक म्हणून मोठ्या मनानं माफ केलं त्यानं मला.
शाळेत असताना कॅमलची कंपास आवडूनही बघायलाही नाही मिळाली त्याला, पण आम्हाला हवी ती गोष्ट मिळाली नाही असं कधीच नाही घडलं.
गाडी,मोबाईल आणि सगळा ऎशआराम पुरवला त्यानं, पण कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही म्हणून आमचं कधीच नाही नडलं.
आमचा बाप कडक शिस्तीचा आहे, असं मित्रांना सांगताना आम्ही कुत्सितपणे हसतो.
पण रात्री तासभर ऊशीरा पोहोचलो घरी तर, येईल गं, म्हणून आईला समजवताना तोच बाप स्वतः मात्र वाटेकडे माझ्या डोळा लावून बसतो.
"आई" घराचं सौभाग्य असली तरी "बाप" म्हणजे घराचं अस्तित्व असतं.
बापाशिवाय कुठल्या घरालाही घराचं असं स्वत्व नसतं.
एक माणूस म्हणून भले त्याच्या जीवनांत असेल तो सर्वांसाठी सामान्य.
पण आदर्श बापाचं मूर्तिमंत ऊदाहरण असंच असावं हे त्याच सर्वांना आहे मनापासून मान्य.
वय वर्ष्रे ५८, तरी आमचा बाप अजून न थकता कष्ट ऊपसतोय.
त्याला सुखी-समाधानी बघायचं आहे म्हणूनंच मी ही शोधतोय मला कुठे सूर आता गवसतोय.

No comments:

Post a Comment