Wednesday, July 4, 2012

मस्त गाणे श्रावणाचे

आज मी गाणार आहे मस्त गाणे श्रावणाचे
पावसा तू ये न ये मी श्राध्द केले आसवांचे

कोरडा दुष्काळ आहे पाचवीला पूजलेला
का म्हणूनी आसवांना मी सदा गाळावयाचे?

नाचणे तालावरी मी पावसा बघ बंद केले
बंद कर तू दु:ख भाळी आमुच्या कोरावयाचे

धुंद आनंदात रमणे रीत माझ्या जीवनाची
मी न आहे मोर ज्यानी सोडले नाचावयाचे

वाट बघती लोक जेंव्हा देवही धावून येतो
श्रेष्ठ का देवाहुनी तू पावसा ठरवावयाचे

पावसा रे ! ओल उरली फक्त आता आसवांची
त्रास दे वाटेल तितका गाव माझे वेदनांचे

वेधशाळा मोजते पाऊस तो झाला किती,
पण
कृष्ण पैशांच्या सरींना मी कसे
मोजावयाचे?

घोषणा पॅकेजची भरगोस झाली, पण
निधीला
पाय फुटले पीडितांनी फास
आता घ्यावयाचे

बंडखोरी शोभते
"निशिकांत"च्या का शायरीला!
रान आता पेटवावे का कुणाला भ्यावयाचे ?

No comments:

Post a Comment